विद्यार्थ्यांसाठी

मुलांना शिकवताना वापर केलेलं इथेही थोडंफार वाचता येईल.


अवयव

हात पाय, हात पाय
उजव्या पायाची बोटं पाच
नाच, नाच, तू उजव्या पायावर नाच!

हस हस, पोट धरुन हस
हसताना दिसले दात
मी तोंडावर धरला हात!

हसले ओठ, दुखले पोट
कोपराने ढोसले, हाताने ढकलले
लागले, लागले मला खूप लागले!

अवयव सगळे पाठ झाले
खांदा, मनगट, ढोपर
तेवढे हरवून गेले!

कपाळावर पडली आठी
करा ना जरा आठवा – आठवी
भुवई, बेंबी राहिली ना पाठी! –  – मोहना


संगत

निळं आकाश
अंधुक प्रकाश
चमकता तारा
गार वारा!

चल ना आई,
जमिनीवर झोपू!
आकाशातल्या चांदण्या
किती ते मोजू!

चंद्र आला सोबतीला
बाबा लागला गायला!
ही खरी गंमत
अशीच हवी रोज संगत! –  – मोहना


स्वयंपाक

ढवळली आमटी डावाने
परतली पोळी काविलथ्याने
खाऊ सारं चवीचवीने!

चव तिखट चटणीची
मजा आंबट लोणच्याची
सोबत आहे कडू कारल्याची!

वेळ झाली स्वयंपाकाची
गडबड उडाली बाबाची
आईला मदत करायची!

पोळी लाटली वाटोळी
तव्यावर टाकली
टम्म फुगली!

घ्या लवकर ताट वाटी
तयार व्हा जेवण्यासाठी
तांब्या आणि भांडच उरलंय बाकी! – – मोहना


वार
सोमवार म्हणजे Monday
मंगळवार म्हणजे Tuesday
मी गिरवते मराठीचे धडे!

wednesday म्हणजे बुधवार
Thursday म्हणजे गुरुवार
काहीतरी पाहिजे गारेगार!

Friday म्हणजे शुक्रवार
Saturday म्हणजे शनिवार
आठवड्यात आहेत सात वार! – – मोहना