४ ते ५ वेळ

११ मार्च २०१८

इंग्रजी शब्दांचे अर्थ सांगणे.
लपविलेल्या गोष्टी शोधणे – खडू, चेंडू, केस, कागद, रुमाल.
या शब्दांचे अनेकवचन सांगणे.
दोन गटांची या शब्दांचा वाक्यात उपयोग करुन दाखविण्याची स्पर्धा.
गोष्ट – डास आणि मुर्ख मुलगा. त्यातील शब्दांचे अर्थ सांगणे.
लेखन आणि वाचन.

४ मार्च २०१८

टोपीविक्या आणि माकडाची गोष्ट चित्रावरुन तयार करणे. चित्रातील गोष्टी ओळखणे.
माझी टोपी हरवली खेळ.
१० मराठी शब्द आणि त्याचं अनेकवचन. – टोपी – टोप्या, माकड – माकडं/माकडे. टोपीविक्या गोष्टीतील सर्व शब्द.
विचारलेल्या प्रश्नाचं पूर्ण वाक्यात उत्तर देणे. जसं ही मुलगी कोण आहे. – ही मुलगी (नाव) आहे.
लेखन, वाचन.

४ फेब्रुवारी २०१८

४ ते ५ वर्गातील मुलं काय शिकली:

मराठी वाक्यांचं इंग्रजी भाषांतर. – तो/ती/ते/तू भारतात गेला आहे/स. (मुलांचा मराठी बोलताना काय गोंधळ होतो ते त्यामुळे लक्षात येतं.)
चित्रातील गोष्टी ओळखणे.
क, ख, ग, घ लिहिणे, वाचणे.
वर्णमाला वाचन.
खालील ३ गोष्टी आणि त्याचं सादरीकरण.

डास आणि मूर्ख मुलगा
एक सुतार होता. तो मेहनती होता. त्याचं वय झालं होतं. त्याच्या डोक्यावरचे केस कमी झाले. अखेर त्याला टक्कल पडलं.
एकदा त्याच्या डोक्यावर डास बसला. तो चावत होता. सुताराने त्याला झटकलं. पण डास पुन्हा डोक्यावर बसला. सुताराने मुलाला बोलावलं,
“या डासाला मार रे. खूप त्रास देतोय.” सुतार म्हणाला. मुलाने काठी घेतली. सुताराच्या डोक्यावर मारली. डास उडाला. पण सुतार जखमी झाला.

बापूंच्या ३ गोष्टी
रामला दुकानात काम मिळालं. दुकानदार म्हणाला,
“राम, बापूंच्या ३ गोष्टी लक्षात ठेव.”
“बापू कोण?” रामने विचारलं.
“महात्मा गांधी.”
“बरं. पण कोणत्या गोष्टी?”
“वाईट बोलायचं नाही, ऐकायचं नाही, पाहायचं नाही.”
“करेन मी तसंच.” राम म्हणाला.

दुकानदार एकदा गावात गेला. तेव्हा दुकानात चोरी झाली.
“अरे मुर्खा, तू काय करत होतास?” दुकानदार चिडला.
राम म्हणाला,
“वाईट पाहायचं नाही म्हणून मी डोळे मिटले. वाईट ऐकायचं नाही म्हणून कानात बोळे घातले. वाईट बोलायचं नाही म्हणून मी काही बोललो नाही.”
“निघ इथून. तू मला बरबाद केलंस.” दुकानदार ओरडला.
राम म्हणाला,
“जातो, जातो. पण तुम्ही असं ओरडताय का. बापूंच्या गोष्टी विसरलात?” आणि रामने तिथून धूम ठोकली.

ससा आणि कासव

एक होता ससा. एक होतं कासव. ससा जोरात धावायचा. कासव हळूहळू चालायचं. एकदा दोघांनी शर्यत लावली. जंगलं संपतं तिथे पोचायचं. जो आधी पोचेल तो जिंकला. ससा धावायला लागला. कासव चालायला लागलं. ससा झाडापाशी पोचला. त्याने मागे वळून पाहिलं. त्याला कासव दिसलं नाही. कासव येईपर्यंत झोपायचं असं त्याने ठरवलं. कासव सशापाशी पोचलं. त्याने सशाला झोपलेलं पाहिलं. ते चालत राहिलं. ससा उठला. पुन्हा त्याने मागे वळून पाहिलं. कासव दिसत नव्हतं. ससा खूश झाला. धावत धावत निघाला. जंगल संपलं. पण कासव तिथे आधीच उभं होतं. जोरात धावणारा ससा हरला. हळू चालणारं कासव जिंकलं.

२७ जानेवारी २०१८

४ ते ५ वर्गातील मुलं काय शिकली:

डास आणि मुर्ख मुलगा गोष्ट.
ससा आणि कासव गोष्ट आणि त्या गोष्टीचं सादरीकरण.
वाचन, लेखन.
चित्रात दिसणार्‍या गोष्टी काय आहेत त्या सांगणे. त्यावरुन विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं पूर्ण वाक्यात देणे.
प्रश्न: उदा. ही बाई काय करत आहे. उत्तर – ही बाई बाकावर बसली आहे.