२७ जानेवारी २०१८

राजूची आई गोष्ट – शेवटचा भाग. प्रत्येकाने पूर्ण गोष्ट लिहिणे, वाचून दाखविणे.
सावित्रीबाई फुले गोष्ट.

सावित्रीबाई फुले
दिडशे वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. पुण्यातल्या भिडेवाड्याकडे एक स्त्री लगबगीने निघाली होती. रस्त्यावरचे लोक तिला पाहून फिदीफिदी हसायला लागले. वाईट, वाईट बोलू लागले. कोणीतरी तिच्यावर शेणगोळे, दगड फेकले. शांतपणे ती स्त्री म्हणाली,
“तुम्ही त्रास दिलात तरी मी माझं काम सोडणार नाही.”
कोण होती ती तरुण स्त्री?
ती स्त्री होती, पहिली भारतीय शिक्षिका सावित्रीबाई फुले. त्या काळात स्त्रियांना शिकायला परवानगी नव्हती. त्यामुळे सावित्रीबाईंना खूप विरोध झाला. पण मग सावित्रीबाई कशा शिकल्या? महात्मा ज्योतीराव फुले हे त्यांचे पती. त्यांनी सावित्रीबाईंना वाचायाला, लिहायला शिकवले. त्या कविता लिहू लागल्या. भाषणे देऊ लागल्या.

ज्योतीराव फुलेंच्या प्रेरणेने त्या शिक्षिका झाल्या. ’शिक्षणामुळे ज्ञान मिळते, माणूस विचार करतो आणि आजूबाजूची परिस्थिती बदलतो.’ यावर त्यांचा विश्वास होता.

ज्योतीराव फुलेंनी भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. मुली शिकल्या तर समाजाची प्रगती होईल हे त्यांना ठाऊक होते. सावित्रीबाईंमुळे तिथे मुली शिकायला यायला लागल्या.

राजूची आई


उन्हाळ्याची सुट्टी होती. बागेत भेळवाले, फुगेवाले यांची झुंबड उडाली होती. मी बाकावर बसले. मीनू झोपाळ्यावर झोका घेत होती. तेवढ्यात एक बाई आल्या.
“राजू, अरे कुठे आहेस?” म्हणत त्या रडायला लागल्या. आम्ही सर्व मदतीला धावलो. राजू सापडला नाही. त्या बाई हताश झाल्या. “घरी गेला असेल.” आम्ही तिची समजूत घातली. मी ती कुठे राहते ते शोधून काढलं. तिच्या घरी न राहवून गेलेच दोन दिवसांनी.
एका आजोबांनी दार उघडलं. “राजू मिळाला का?” मी विचारलं.
“कोण राजू?” त्यांनी आश्चर्याने विचारलं.
“हरवलेला मुलगा. त्याची आई त्याला शोधत होती.” ते हसले,
“अहो, त्याची आई वेगवेगळ्या कल्पना करते आणि घरी सर्वांना काय झालं ते रंगवून सांगते.”
“असं का करतात? त्या वेड्या आहेत का?” मी आश्चर्याने विचारलं.
“नाही. ती लेखिका आहे.” ते म्हणाले.